मनोज जरांगे पाटलांची प्रकृती आणखीनच खालावली. उपचार घेणार की नाही? याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यानंतर नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहाने जरांगेंना पाणी पाजलं. पण, जरांगेची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घोटवत नाही. त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.
मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ‘पाणी घ्या’ म्हणत घोषणाबाजी सुरु आहे. तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे. ‘पाणी घ्या, उपचार घ्या’म्हणत आंदोलनस्थळी उपस्थितांची घोषणाबाजी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटलांना औषधोपचार घेण्यासंदर्भात विचारणा केली आहे. तुम्ही उपचार घेणार की नाही? याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.