अनेक वर्षानंतर अजित दादांची तोफ भोर तालुक्यात धडाडणार; माळेगाव(नसरापूर) येथे कार्यकर्ता आणि भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन
नसरापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांनी बहुमताच्या जोरावर पक्ष आणि निवडणूक चिन्ह मिळविल्यानंतर आता बारामती लोकसभा कोण जिंकतंय याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागणार आहे.
बारामती लोकसभा निवडणूक जिंकण ही अजित पवार यांच्यासाठी अत्यंत जिकीरीची गोष्ट बनली आहे. यावर अजित पवार याचं भवितव्य अवलंबून आहे. त्यातच बारामती लोकसभेत अजितदादा यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उतरविण्याची तयारी सुरु आहे. यातच आता लोकसभा निवडणूकीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळें विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या शनिवारी(दि. २४ फेब्रुवारी) रोजी बारामती लोकसभा मतदार संघातील भोर आणि वेल्हा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान शनिवारी भोर आणि वेल्हा तालुक्यात राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता आणि भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शनिवारी दुपारी १ वाजता भोर तालुक्यातील माळेगाव फाटा(नसरापूर) येथील शिवशंभो मंगल कार्यालय येथे हा मेळावा घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मेळाव्याच्या नियोजनासाठी भोर तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची भोरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली आहे. यावेळी भोर तालुका राष्ट्रवादीचे नेते रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, संतोष घोरपडे, गणेश निगडे आणि भोर शहराच्या वतीने कुणाल धुमाळ, केदार देशपांडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली.
अजित पवार यांनी बारामती मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी सभा घेत भावनिक न होता मी सांगेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन अजित पवार करीत आहेत. अनेक वर्षानंतर अजित पवार यांची सभा भोर तालुक्यात होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर भोर आणि वेल्हा तालुक्यात २४ तारखेला पहिल्यांदाच अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे काय बोलतात याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.