नीरेत पोलीसच निघाला अट्टल दुचाकीचोर
नीरा : नीरा (जिल्हा पुणे) येथील पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक त्रासले होते. वाढत्या दुचाकी चोऱ्या रोखण्याचे मोठे आव्हान जेजुरी पोलिसांपुढे होते; मात्र पोलिसांना चौकशीत धक्कादायक गोष्ट समोर आली.
हा दुचाकी चोरणारा पोलीस कर्मचारीच निघाला. त्याच्याकडून चोरी केलेल्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या, तर त्या विकत घेणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
चोरीच्या दुचाकी खरेदी करणारे अस्लम मुलाणी आणि पृथ्वीराज ठोंबरे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. नीरा हद्दीतील दुचाकी चोरीप्रकरणी तांत्रिक तपास आणि पोलिसांचे खबरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून विनोद नामदार याचा सहभाग दिसून आला. त्याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत नामदारने ८ दुचाकी चोरल्याचे मान्य केले. नामदार हा पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे.