जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत झालेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा; एकास अटक
पुणे : चार जणांनी मिळून एका तरुणाचा जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत तळेगाव येथे निर्घृणपणे खून केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना मुंबई पुणे महामार्गावर रोडलगत निलया सोसायटी जवळील भंगाराच्या दुकानाजवळ कृष्णा कैलास शेळके (रा. राऊतवाडी, पवनानगर ता. मावळ) याला चार अनोळखी इसमांनी लाथा बुक्याने व चाकुने मारहाण करुन जिवे मारले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून करण्यात आला.
खून केल्यानंतर आरोपी तळ्याच्या दिशेने पळून गेले. त्यातील एक आरोपी धिरज ऊर्फ मोठा बांडी अनिल गरुड हा आहे. गुन्हे शाखेने तळेगाव स्टेशन परिसरातून धिरज ऊर्फ मोठा बांडी अनिल गरुड (वय १९ वर्षे, रा. संस्कृती अपार्टमेंट, राव कॉलनी, तळेगाव दाभाडे ता. मावळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. हा गुन्हा किरकोळ वादातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने, गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस अंमलदार बनसुडे, राठोड, बहीरट, मालुसरे, सुर्यवंशी, ठाकरे, शेख, गोनटे, गुट्टे, इघारे, खेडकर, माने, गाडेकर, भोसले, ब्रम्हांदे, तांत्रीक विश्लेषण शाखेकडील नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.