तिसरे अपत्य लपविल्याने भोर तालुक्यातील कांबरे खे. बा. ग्रामपंचायतीचे एक सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नसरापूर : भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीरंग पर्वती कोंढाळकर यांना तीन अपत्य असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले. कांबरे खे. बा. ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीरंग कोंढाळकर यांनी ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविताना त्यांना सन २००१ नंतर तीन अपत्य असताना एक अपत्य लपवून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोनच अपत्य असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
याबाबत ग्रामस्थ सुनील सुरेश सुतार यांनी जून २०२३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यात श्रीरंग कोंढाळकर यांना सन २००१ नंतर तीन अपत्य असल्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ अन्वये विवाद अर्ज दाखल केला होता. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व संबंधितांना नोटीस पाठवून अर्जदार व जाब देणारे यांचे जाबजबाब घेऊन त्यांनी दिलेल्या पुराव्याची कागदपत्रांची पडताळणी केली. त्यात तक्रारदार सुतार यांचा अर्ज ग्राह्य धरुन मान्य करण्यात येऊन सदस्य कोंढाळकर यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या ११ डिसेंबर २०२४ च्या निर्णयाचे पत्र तक्रारदार यांच्यासह तहसीलदार भोर, गटविकास अधिकारी भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे व ग्रामसेवक ग्रामपंचायत कांबरे खे.बा. यांना पाठवण्यात आले.