सारोळा वीर रोडच्या झालेल्या निकृष्ट कामाबाबत रास्ता रोको; ठेकेदार के. डी. सोनवणे यांना काळया यादीत टाका अशी मागणी
सारोळा : सारोळा-वीर राज्य मार्ग क्रमांक १३२ यांच्या मागील ६-७ महिन्यापूर्वी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निकृष्ट कामाबाबत संशय व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे. काम चालू असतानाच निकृष्ट काम पाहताच ग्रामस्थांनी विरोध केला असल्याचे सांगितले. त्यावेळी ग्रामस्थांचा विरोध झुगारून ठेकेदाराच्या कामावर पडदा टाकून सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम पूर्णत्वास नेले. आजच्या कामाची परिस्थिती पाहता जागोजागी खड्डे,चिरा व भेगा पडणे, साईड पट्टे नसणे, रोड खचने, यावरून कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसत असल्याने भोर तालुक्यातील पूर्व भागातील स्थानिक ग्रामस्थ व सरपंचांनी एकत्र येऊन रास्ता रोको करण्याचे निवेदन दिले आहे.
सारोळा वीर या रोडच्या कामाची ठेकेदारी के. डी. सोनवणे यांनाच दिली जात असल्याने या कामाचा निकृष्ट दर्जा व सुरक्षतेबाबत चा धोका नेहमीच जाणवत असतो. याबाबत राजकीय व शासकीय प्रेमापोटी याच्या कडे कानाडोळा केला जात असल्याने यांना काळया यादीत टाकावे असे ग्रामस्थांनी निवेदनात दिले आहे. या कामात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. सदरहू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या कामाच्या तपशिला नुसार काम झाले आहे की नाही याचा अहवाल स्थानिक ग्रामस्थांना दिला नाही तर स्थानिक ग्रामस्थांनी रस्ता रोको करणार असल्याचे निवेदन आमदार संग्राम थोपटे, मुख्य अभियंता सा. बां. पुणे, अधीक्षक सा. बां. पुणे, कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग पुणे, उपविभागीय अधिकारी कार्यालय भोर, तहसीलदार कार्यालय भोर, राजगड पोलीस स्टेशन भोर, प्रहार जनशक्ती भोर, पत्रकार संघटना भोर यांना प्रामुख्याने प्रवीण धोंडे, अमोल घाडगे, सागर बोबडे, गणेश निगडे, भोंगवली सरपंच अरुण पवार यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
सारोळा-वीर रोड व भोंगवली फाटा-माहूरखिंड या रोडवरून ५० हून अधिक गावांचा येण्याजाण्याचा संपर्क असल्याने या रोड वर खड्डे,चिरा व भेगा पडणे, साईड पट्टे नसणे, रोड खचने याचा वाहनचालकांना त्रास होत असतो. अनेकांना या रोड वर अपघात होऊन दुखापतीस सामोरे जावे लागले आहे. मात्र ही चूक कोणाची? याबाबत वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला फोन करून अधिकारी उडवा उडविची उत्तरे देत असून ठेकेदार के. डी.सोनवणे यांना पाठीशी घालत आहेत. याबाबत लवकरच मंगळवार दि.१२ नोव्हेंबर रोजी रस्त्याची दुरुस्ती व झालेल्या कामाचा अहवाल संक्षिप्त रुपात द्यावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करून ठेकेदार के. डी.सोनवणे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विरोधात रास्ता रोको करून जाहीर निषेध करणार असल्याचे निवेदनात सांगितले.
सा.बां.अधिकारी व ठेकेदार जनतेची लूट करीत आहेत. सारोळा-वीर रोडच्या झालेल्या दर्जेदार कामाचा अहवाल ग्रामस्थांना लवकर मिळावा.
-संतोष बोबडे (सरपंच राजापुर, ता.भोर, जि.पुणे).
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.यामुळे आजही अपघातामुळे जिवित व वित्त हानीची शक्यता नाकारता येत नाही.
-अजय कांबळे (उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका).
सारोळा-वीर रोडवर रोडसेफ्टी साठी मारण्यात येणारे पांढरे पट्टे हे जुन्या व नवीन काम झालेल्या संपूर्ण मार्गावर मारण्यात आल्यामुळे लोकांना वाटत आहे की या रोड चे संपूर्ण काम झाले आहे. तर तसे नसून ठराविक पट्ट्यात च मागील काम झाले आहे. नव्याने झालेल्या कामावर एकही खड्डा पडलेला नाही. आणि जुन्या रोड वर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम लवकरच चालू होईल.
- संजय वाघज (कार्यकारी अभियंता सा.बां.वि. भोर).