शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले
शिरूर : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सोमवार (दि २५ नोव्हेंबर) रोजी रात्री १:३० च्या सुमारास दरोडा टाकुन एका महिलेला जबर मारहाण करुन तिच्या कानातील सोन्याचे ऐवज चोरण्यासाठी तिने कान धारधार हत्याराने कापल्याची गंभीर घटना घडली असुन या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सोपान करपे (वय ४८ वर्ष) रा. गुनाट (करपेवस्ती) ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन चार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपान करपे हे पत्नी सुमन, मुलगा राजेंद्र, सुन कल्पना, मुलगा आत्माराम, सुन ज्योती व नांतवाडासह गुनाट गावातील करपे वस्ती येथे राहत असुन शेती करुन कुटुबांची उपजिवीका करतात. सोपान करपे हे आळंदी येथे पायवारी करण्यासाठी गेले असल्याने दि २५ नोव्हेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १:३० च्या सुमारास त्यांच्या पत्नी सुमन खोलीमध्ये एकट्याच दरवाजा ओढुन झोपल्या होत्या. तसेच शेजारच्या खोलीत त्यांची दोन मुले झोपली होती.
मध्यरात्री १:३० च्या सुमारास तोंडाला काळे मास्क लावलेले चार अज्ञात इसम घरात आले आणि त्यांनी अचानक सुमन करपे यांच्या तोंडावरील पांघरुन काढले. त्यावेळी त्या खुप घाबरल्या आणि त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यातील एका इसमाने त्यांचे तोंड दाबले आणि त्यांना हाताने व लाथाबुक्याने मारहान करण्यास सुरवात केली. तसेच जबरदस्तीने त्यांच्या गळ्याला चाकु लावत गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र काढुन घेतले.
पण कानातील सोन्याचे झुबे व वेल काढता येत नसल्याने चोरांनी कोणत्या तरी धारदार हत्याराच्या साह्याने त्यांचे दोन्ही कान खालील बाजुने कापुन झुबे व वेल काढुन घेतले. तसेच पेटीतील तीन हजारांची रोख रक्कम चोरी करुन घेवुन गेले. त्यावेळी मुलांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. सुमन करपे या मुलांकडे गेल्या असता त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती. त्यांनी ती कडी काढली आणि मुले व सुना बाहेर आल्या. त्यांनंतर त्यांचा मुलगा राजेंद्र व आत्माराम त्यांना औषधोपचारासाठी दवाखाण्यात घेवुन गेले.
या दरोड्यात सोन्याचे मणी मंगळसुत्र, कानातील सोन्याचे झुबे व वेल आणि ५०० रुपयाच्या ६ नोटा अशी एकूण ६३ हजार रुपयांची चोरी झाली असुन या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरी हे करत आहेत. या घटनास्थळी पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक शिळीमकर, शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी भेट दिली.