भोरच्या भर बाजारपेठेत व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला; व्यावसायिक जखमी
भोर : भोर शहरातील बाजारपेठेतील रावळ चौकात एका कपडे व्यावसायिकावर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज शुक्रवारी(दि. १९ जुलै) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. आज बेंदुर सणाची लगबग असल्याने भोरची बाजारपेठ गजबजली होती. आणि अशातच रावळ चौकात एका तरुणाने चालत येऊन कपडे व्यावसायिक सचिन मांढरे(अंदाजे वय ४० वर्ष, रा. बाजार पेठ, भोर शहर) यांच्या मानेवर कोयत्याने वार केला. यामुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. यामध्ये मांढरे हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी भोर शहरातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच वार करणाऱ्या तरुणाला तेथील स्थानिक लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पळून गेला. भोर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळेतच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपी हा अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.