भोर विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागात प्रभावी संपर्क यंत्रणा राबवा – सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे
राजगड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करुन भोर विधानसभा मतदारसंघात असलेल्या दुर्गम भागात प्रभावी संपर्क यंत्रणा राबवावी आणि दूरसंचार सुविधा नसलेल्या भागात संदेशवाहकांची मदत घ्यावी, असे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिले. राजगड तालुक्यात कोंढावळे बु. येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भोर विधानसभा मतदारसंघात नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण सत्राच्यावेळी ते बोलत होते. यावेळी वेल्हा तहसीलदार निवास ढाणे, निवासी नायब तहसीलदार राजश्री भोसले, निवडणूक नायब तहसीलदार उत्तम बडे, नायब तहसीलदार मनीषा भुतकर आदी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र कचरे म्हणाले की, भोर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संदेशवाहक (रायडर) नेमण्यात आले आहे. त्यासोबत स्थानिक पातळीवर कार्यरत ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आदींची मदत घ्यावी. मतदानाच्या दिवशी तांत्रिक अडचण असल्यास तात्काळ वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन स्थानिक पातळीवर ती तात्काळ दूर करावी. मतदान केंद्राबाबत दर दोन तासांनी माहिती प्राप्त होईल, असे नियोजन करावे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी कर्तव्य बजावत असताना भारत निवडणूक आयोगाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे.
यावेळी ईव्हीएमचे बॅलेट युनिट व कंट्रोल ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी, मतदान केद्रांची रचना, मतदान साहित्याची वाहतूक, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, अभिरूप मतदान (मॉकपोल), मतदानाच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन आदीबाबत राजेंद्र कचरे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ईव्हीएम यंत्राच्या प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.