धांगवडीतील कंपनीत ३० वर्षीय स्थानिक युवकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी (ता. भोर) गावच्या हद्दीतील एका कंपनीत काम करणाऱ्या ३० वर्षीय युवकाचा आज बुधवारी (दि. १६ एप्रिल) दुपारी शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तेजस चंद्रकांत तनपुरे (रा. धांगवडी, ता. भोर) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस तनपुरे हा धांगवडी गावातच असणाऱ्या धन्वी फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कोकम सरबत लिक्विड बनवणाऱ्या कंपनीत कामाला होता. आज बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे काम करत असताना तेजसला कंपनीतच असणाऱ्या एका मशिनला शॉक लागला. यांनतर कंपनीतील इतर सहकाऱ्यांनी तेजसला किकवी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तेजसला मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. कंपनीतील मशीनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊन कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. राजगड पोलिसांकडून सदर घटनेबाबतचा अधिक तपास सुरू आहे.