छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले पुरंदरवर घुमला ढोल-ताशा, तुतारीचा निनाद
पुरंदर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त किल्ले पुरंदर येथे भगवे झेंडे, लाल, गुलाबी, भगवे फेटे, फुलांची केलेली सजावट, पाळणा गीत, महाप्रसाद, ढोल ताशांचा गजर तसेच सनई आणि तुतारीचा निनाद यामुळे कार्यक्रमात रंगत आली. महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शंभू भक्तांनी किल्ल्यावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रात्री १२ वाजेपासून शंभू भक्त ज्योत घेवून येत होते. छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणांनी किल्ल्याचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. पुरंदर किल्ल्यावरील श्री महादेव मंदिरात सकाळी ८ वाजता शासकीय महापूजा करण्यात आली.
त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, पुरंदरचे आमदार संजय जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, राज्य बांधकाम विभागाच्या अभियंता स्वाती दहिवाल यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे नेते, प्रतिनिधी, शिक्षक आणि हजारो शंभू भक्त उपस्थित होते.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या शिक्षक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी प्राध्यापक यशवंतजी गोसावी, अजयसिंह सावंत खास, संदीपआप्पा जगताप, संतोषभाऊ हगवणे, सागरनाना जगताप, प्रदीपआण्णा पोमन, चेतन महाजन, चंद्रकांत बोरकर तसेच पुरंदर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, रणजीत बाठे, योगेश देशमुख, रविराज शिंदे आणि सर्व पुरस्कार्थी व शंभूभक्त उपस्थित होते.