वेल्ह्यातील भोर्डी येथील निकृष्ट दर्जाच्या काँक्रीटीकरण करणाऱ्या कंत्राटदाराचे लायसन्स रद्द करण्यात यावे, अभिजीत कदम यांची मागणी
वेल्हा : निकृष्ट दर्जाचे सिमेंट रोडचे काम केल्याबद्दल कंत्राटदार अलगुडे यांचे बिल रोखावे व पुढील एक वर्षाकरीता त्याचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी अभिजीत बाळू कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, ग्रुप गामपंचायत केळद, मौजे भोर्डी, ता. वेल्हा, जि. पुणे येथील मुख्य चौकातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणेचे काम कंत्राटदार अलगुडे यांनी घेतले होते व आहे. सदर गाव हे दुर्गम डोंगरातील खेडेगाव असल्यामुळे व सदर काम पाहणेस कोणीही वरिष्ठ दर्जाचा अधिकारी येणार नसल्यामुळे सदर ठेकेदाराने सदर पाच लाख रूपये इस्टीमेटचे काम एक लाखामध्ये गुंडळले आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने माती मिश्रीत खडी, क्रश, सॅन्ड व खराब दर्जाचे सिमेंटचा वापर केला आहे. सदर काम ठेकेदाराने शनिवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सुरू करून सोमवार दि. २० नोव्हेंबर यादरम्यान संपूर्ण केले. सदर काँक्रीटला मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी पाणी देण्यास सुरूवात केल्यापासून सदर रस्त्याची खडी, क्रशसॅन्ड वाहून जावू लागली आहे. सदर रोड महिणा दोन महिन्यांत बाद होणार असून, पहिल्या पावसामध्ये वाहून जाणार आहे. सदर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामपंचायत केळद, ग्रामस्त भोर्डी तसेच महाराष्ट्र शासन यांचे अतिशय मोठे नुकसान होणार आहे. तरी सदर कंत्राटदाराचे पंचायत समिती वेल्हा, ग्रामपंचायत केळद, जिल्हा परिषद पुणे यांनी बिल रोखुन ठेवावे व सदर ठेकेदाराकडून पुन्हा रस्त्याचे काँक्रटीकरण करण्याचे काम करून घ्यावे व पुढील एक वर्षाकरीता त्याचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी भोर्डी गावचे स्थानिक रहिवासी अभिजीत बाळू कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.