खेड शिवापूर येथील हॉटेलच्या उद्घाटनासाठी चक्क पुणे-सातारा सेवा रस्ताच बंद; प्रवाशांचे व नागरिकांचे हाल

खेडशिवापुर : पुणे-सातारा सेवा रस्त्यावरील एका हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी चक्क कोंढणपूर फाट्याजवळील सेवा रस्ताच शनिवारी (दि. २५) दुपारी चारनंतर बंद करण्याचा पराक्रम करण्यात आला.

यामुळे दवाखान्यात जाणाऱ्यांचे आणि स्थानिकांसह पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. खूप वेळ रस्ता यावेळेस बंदच असल्याचे दिसून आले.

पुणे-सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाट्याजवळ एका हॉटेलचा उद्घाटन समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आयोजकांनी सेवा रस्त्यावर बाऊन्सर थांबवून सेवा रस्ताच बंद केला होता. त्यामुळे पीएमपीएमएलने आलेल्या सामान्य नागरिकांना खेड शिवापूरपासून पायी चालत कोंढणपूर फाट्यावर यावे लागले. सेवा रस्ता बंद केल्यामुळे या भागात असलेल्या चार दवाखान्यांत जाणारी वाहतूक बंद झाली होती. याबाबतचे गांभीर्य आयोजकांना नव्हते, हे प्रामुख्याने दिसून आले. हॉटेलच्या उद्घाटनावेळी येणारे पाहुणे आणि इतरांसाठी तेथे लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे सेवा रस्ता बंद करून तेथे भव्य स्टेज उभारण्यात आला आणि लावणीचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

Advertisement

विशेष म्हणजे कोंढणपूर फाट्यापासून सिंहगडापर्यंत असणाऱ्या गावातील नागरिकांना जायचे कसे? हा प्रश्न उपस्थित झाला होता. पीएमपीएमएल चालकाने रस्ता बंद असल्याने काही महिलांना खेड-शिवापूरजवळ उतरविले. आजपर्यंत पहिल्यांदाच पीएमपीएमएल बस उड्डाणपुलावरून गेल्याचे दिसून आले. केवळ पीएमपीएमएल बसच नव्हे तर एसटी महामंडळाच्या बसदेखील यावेळी उड्डाणपुलावरून गेल्या.

मुळात सेवा रस्ता बंद करणे हा गुन्हा आहे. तसेच या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहे हे आयोजकांना का समजले नाही? या दरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास त्यास कोण जबाबदार ? याबाबत महामार्ग वाहतूक विभाग, स्थानिक पोलीस व महामार्ग कर्मचारी बघ्याची भूमिका घेत होते का? असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page