बोंबला! पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडनुकींना यंदाही मुहूर्त नाही
पुणे : कोरोना आला आणि तेव्हापासूनच लोकप्रतिनिधीराज संपून प्रशासकराज आले. त्या २ वर्षा नंतर निवडणुका आज होणार, उद्या होणार असे म्हणत तब्बल दोन वर्षे झाली तरी मुदत संपलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका झाल्याच नाहीत.
महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात ९ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आता त्यासाठी ४ मार्चची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका घेण्याची सरकार आणि न्यायालयाला देखील फारशी आवश्यक्यता वाटत नसावी. सुमारे ४ वर्षाहून अधिक काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा खेळ मांडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झालेली असेल. त्यामुळे या निवडणुकांचे भवितव्य लोकसभा निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता आहे. चार मार्चला देखील सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लगेच महाराष्ट्रातील विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात होईल. सर्व यंत्रणा त्याच कामात लागलेली असेल. त्यामुळे मुदत संपलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका या वर्षी घेणे शक्य होणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे या निवडणुकीसाठी २०२५ उजाडण्याची शक्यता नाकारली जात नाही.