आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत
आंबेगाव : बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचे परिणाम मानवी जीवनावर होऊ लागले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याचे दर्शन कधीही, कुठेही होऊ लागले आहे.
धामणी (ता. आंबेगाव ) येथील द्रौणागिरी मळ्यातील पिराच्या मंदिराजवळ दूध उत्पादक शेतकरी अमित अंकुश जाधव यांच्या घराजवळ त्यांचा मुक्त संचार बंदिस्त गोठा आहे. या गोठ्यात लहान मोठी अठरा जनावरे आहेत. गोठ्याला तारेचे कंपाऊंड आहे. मात्र, यांच कंपाऊंडच्या खालून दोन दिवसांपूर्वी रात्री एक ते दोनच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून तेरा महिन्याच्या कालवडीला फरपटत ओढून झाडीत नेऊन ठार मारले.
सकाळी अमित जाधव दूध काढणीसाठी गोठ्यात आले असता त्यांच्या लक्षात ही घटना आली. यामध्ये या शेतकऱ्याचे तीस ते चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी वनपाल सोनल भालेराव यांच्याशी संपर्क केला त्यांनी वनकर्मचारी दिलीप वाघ यांना घटनास्थळाची पहाणीसाठी पाठवले होते.
या परिसरात बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने येथे त्वरीत पिंजरा लावावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, माजी सरपंच सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव यांनी केली आहे.