मस्करीत गेला जीव! कॉम्प्रेसरचा पाईप गुदद्वारास लावल्याने हवा पोटात जाऊन युवकाचा मृत्यू
हडपसर : पिठाच्या कंपनीत मजा करण्याच्या नादात त्याने कॉम्प्रेसरचा पाईप त्याच्या गुदद्वाराला लावला. त्यामुळे त्यातील हवा प्रचंड वेगाने पोटात जाऊन युवकाचा मृत्यु झाला. हा धक्कादायक प्रकार हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेटमधील पुना फ्लोअर अँड फुड कंपनीत सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.
मोतीलाल साहु (वय १६) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी धिरजसिंग गोपालसिंग गौड (वय २१) याला अटक केली आहे. याबाबत शंकरदिन रामदिन साहु (वय ३४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पुना फ्लोअर अॅड फुडस या कंपनीत कामाला आहेत. कंपनीच्या आवारात त्यांची रहायची सोय आहे. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी यांचा भाचा मोतीलाल साहु त्यांच्याकडे आला होता. मैदा तयार करण्याच्या काम फिर्यादी व आरोपी तिसर्या मजल्यावर करत होते. त्यावेळी तेथे चेस्टा मस्करी करताना धिरजसिंग याने मोतीलाल याच्या गुदद्वाराला कंपनीतील साफसफाईसाठी वापरत असलेला हवेचा कॉम्प्रेसरचा पाइप लावला.
कॉम्प्रेसरमधील हवा वेगाने मोतीलाल याच्या पोटात केली. त्यामुळे तो जागीच कोसळला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाला. हडपसर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक कवळे अधिक तपास करीत आहेत.