भोर विधानसभेत अर्ज भरण्याचा चौथा दिवसही निरंक; अद्यापपर्यंत एकमेव आमदार संग्राम थोपटेंचा अर्ज दाखल
भोर : महाराष्ट्रात विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर केलेल्या तारखेप्रमाणे २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर यादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
यादरम्यान भोर विधानसभा मतदार संघासाठी मंगळवार(दि. २२ ऑक्टोबर), बुधवार(दि. २३ ऑक्टोबर) या दोन दिवशी १५ इच्छुक उमेदवारांनी ३१ अर्ज नेले होते. तर या दोनही दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झाला नव्हता. गुरुवारी(दि. २४ ऑक्टोबर) महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात भोर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे दाखल केला.
यांनतर आज शुक्रवारी(दि. २५ ऑक्टोबर) ७ इच्छुक उमेदवारांनी १५ अर्ज नेले. तर एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झाला नसून आजचा दिवसही निरंक ठरला असल्याची माहिती भोर विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिली.
उद्या शनिवारी(दि. २६ ऑक्टोबर) व रविवारी(दि. २७ ऑक्टोबर) शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवशी कोणत्याही उमेदवाराला अर्ज भरता येणार नसून त्यानंतर २८ ऑक्टोबर व २९ ऑक्टोबर हे दोनच दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक असणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसात अजून कोण-कोण अर्ज भरणार याकडे मात्र भोर-राजगड-मुळशीतील जनतेचे लक्ष लागले आहे.