हुंड्या वरून विवाहितेचा छळ; राजगड पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, हुंडा प्रतिबंधक कायद्याला ६२ वर्षे पूर्ण, तरी हुंडा प्रथा थांबेना!
सारोळा : हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार राजगड पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या किकवी पोलीस चौकीत दाखल झाली आहे. तुझ्या घरच्यांनी लग्नात हुंडा म्हणून पैसे व १० तोळे सोने दिले नाहीत, तसेच नविन घर घेण्यासाठी १० लाख रूपये व दोन एकर जमिन माझ्या नावावर करून द्यावी तरच आम्ही तुला नांदवेल नाहीतर तुला घटस्फोट घ्यावा लागेल असे सांगून पती व पतीकडील नातेवाईकांनी नांदवायला नकार दिला व घराबाहेर हाकलून दिले, असा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भोर तालुक्यातील पूर्व भागातील २९ वर्षीय एका पिडीत महिलेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. २०२१ मध्ये या महिलेचे लग्न मुळशीतील एका तरुणाशी झाले होते. जवळपास या लग्नाला अडीच वर्षे झाले आहेत. सध्या हे कुटुंब कात्रज येथे वास्तव्यास आहे. लग्नानंतर काही दिवस या महिलेला चांगले वागवले. नंतर मात्र हुंड्यावरून पती, सासू, सासरे, दीर, नणंद, नंदावा आणि पतीचे मामा यांनी वारंवार शिवीगाळ, दमदाटी करून शारीरीक व मानसीक छळ करू लागले. सदर घटना ही जून २०२२ पासून ते डिसेंबर २०२३ मध्ये सध्या वास्तव्यास असणाऱ्या कात्रज येथील राहत्या घरी घडली असल्याची तक्रार सदर महीलेने शनिवार (९ डिसेंबर) रोजी रात्री १० वाजता राजगड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. राजगड पोलीस या घटनेवर काय भूमिका घेणार? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार नाना मदने करीत आहेत.
हुंडा प्रतिबंधक कायद्याला ६२ वर्षे पूर्ण, तरी हुंडा प्रथा थांबेना!
“हुंडा” हा दोन अक्षरी शब्द वधूपित्याला कर्जबाजारी करणारा आणि वरपक्षाला मालदार करणारा आणि सुखावणारा शब्द! “हुंडा” हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज २१व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे; स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही हुंडाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. १९६१ मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात येतो आणि तरीही आज आपल्या भारत देशात दर तासाला एक नववधू हुंडाबळी होते; पैशाच्या हव्यासापायी मारली जाते आणि तरीही हुंडा देणे-घेणे ही समाजात प्रतिष्ठेची बाब मानली जाते. पुरोगामी म्हणविणा-या महाराष्ट्रात आजही दररोज एक हुंडाबळी जातोय. सासरच्या मंडळींकडून आठवड्याला किमान तीन महिलांच्या हत्येचा प्रयत्न होतो, तर या छळाला कंटाळून आणि हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नाही म्हणून दररोज पाच महिला आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवतात. या स्वतंत्र भारतात त्यांना जगण्याचा अधिकार का नाकारला जातो? या प्रश्नाचे उत्तर आपण सगळी गेली चाळीस वर्षे शोधत आहोत; परंतु अजून सापडलेले नाही.अहवालानुसार महाराष्ट्रात ३५% गुन्ह्यांचा तपास पूर्ण न झाल्यामुळे कोर्टात आरोपपत्रच दाखल होत नाही. सासरच्या मंडळींकडून छळाच्या ज्या तक्रारी दाखल होतात त्यातल्या दोन टक्के आरोपींनाही शिक्षा होत नसल्याचे आकडेवारी सांगते. या परिस्थितीत पुरुषांना किंवा गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही आणि महिलांना स्वत:च्या हक्कांची/अधिकारांची जाण नाही, असेच म्हणावे लागेल. अगणित स्त्रियांच्या जीवनाची राखरांगोळी झाली. परंतु हुंडा प्रथेचा अंत काही दृष्टिपथात नाही. भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारी ही प्रथा नष्ट करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे. विवाहित महिलांवर हुंड्यासाठी घराघरांमध्ये होणारे मानसिक व शारीरिक शोषण, हिंसाचार हे भयावह असूनही त्याबाबत समाज इतका उदासीन का? या प्रश्नाचे उत्तरच एक यक्षप्रश्न आहे.