पुरंदर तालुक्यात दारूच्या पैश्याच्या कारणावरून तरुणाचा खून
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथे दारू पिण्याच्या पैश्याच्या कारणावरून अक्षय संजय कुंभारकर (वय २५ रा. वनपुरी ता. पुरंदर जि. पुणे) या तरुणाचा मारहाण करून तलावाच्या पाण्यात फेकून देवून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. जेजुरी पोलिसांनी सुनील शशिकांत सावंत (रा.सावंत वस्ती पारगाव मेमाणे, ता. पुरंदर, जि. पुणे) यास ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ३० रोजी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव मेमाणे येथे दुपारी साडे तीन ते चार च्या दरम्यान सुनील सावंत याने अक्षय कुंभारकर यास दारू पिण्याच्या पैश्याच्या कारणावरून शिवागाळ व हातापायाने मारहाण करून पाण्याच्या तलावात फेकून दिले. या तरुणास गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल केले असता उपचारा दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. या बाबत अक्षय कुंभारकर याचे भाऊ अजय संजय कुंभारकर यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. आरोपी सुनील सावंत यास जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे हे अधिक तपास करीत आहेत