भोर तालुक्यातील शिवरे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आर्थिक साक्षरता अभियान; बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
नसरापूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नाबार्ड आणि जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने अथिऀक साक्षरता कार्यक्रम राबवन्यांचे ठरवले आहे. यांच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक-युवतींची वैयक्तिक व कौटुंबिक उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी व त्यांना आर्थिक बाबींविषयी ज्ञान व कौशल्य मिळून त्या परिपूर्ण व्हाव्यात या हेतूने गावोगावी जाऊन आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान सुरू करण्यात आले आहे.

या अभियानाच्या माध्यमातून शिवरे (ता. भोर) येथे आज रविवारी (दि. १७ डिसेंबर) शाखेच्या वतीने महिलांसाठी आर्थिक साक्षरता अभियान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांची नवीन बचत खाती उघडून त्यांना २ लाख विम्याचा लाभ, एटीएम कार्ड व बँकेच्या अन्य योजना याबाबत माहिती देऊन जागृती करण्यात आली. विभागीय अधिकारी विनोद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे शाखा व्यवस्थापक सागर गाडे, सिकंदर हिंगे यांनी या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन केले.

डिजिटल युगामध्ये ग्रामीण भागातील बहुतांश महिलांना बँकेचे व्यवहार कसे करायचे याविषयीही ज्ञान नाही याचा विचार करून महिला डिजिटल साक्षर व्हाव्यात त्यांना बँकेविषयी सखोल ज्ञान होईल, त्यांच्याकडून आर्थिक बचत होईल व या बचतीतूनच भविष्यात व्यवसाय वाढीसाठी त्यांना पाठबळ मिळेल. तर अनेक कुटुंबांत घरातील कर्ता पुरुष बँकेत येतात, परंतु महिला मात्र बँकेपासून दूर राहतात अशा वेळी महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहाव्यात, त्यांनी बँकेत बचत करावी, एटीएम सहऑनलाइन बँकिंग याची माहिती करून घ्यावी या हेतूने हा उपक्रम राबविला जात असल्याचे बँकेचे शाखा व्यवस्थापक सागर गाडे यांनी सांगितले. याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या कार्यक्रमात विशेषतः शिवरे गावातील बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे पहावयास मिळाले.