काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
राजगड : वेल्हे (राजगड) तालुक्यामधील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काॅंग्रेस कार्यकर्ते अमोल नलावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस पुणे येथे आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
वेल्हे तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अमोल नलावडे हे कुरण खु–विंझर गटातून इच्छूक आहेत. २०१२ साली त्यांच्या पत्नी वसुधा अमोल नलावडे या बहुसंख्य मतांनी विजयी झाल्या होत्या. तर २०१७ साली अमोल नलावडे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा वेल्हे तालुक्यांतील तळागाळातील लोकांपर्यंत जनसंपर्क आहे. अशा अचानक झालेल्या पक्ष प्रवेशाने येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे वेल्हे (राजगड) तालुक्याचे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रसंगी वेल्हे (राजगड) तालुक्यांतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.