सांगवीतील तरुणीचे आत्महत्या प्रकरण चिघळले; शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगवी ग्रामस्थ आक्रमक
शिरवळ : सावित्री बाई फुलेंची जन्मभूमी असणाऱ्या नायगाव लगतच्याच सांगवी (ता.खंडाळा जि. सातारा) गावातील पीडित मानसी मच्छिंद्र लोखंडे (वय १५ वर्षे) या युवतीला शनिवारी (१६ डिसेंबर) रोजी आपले जीवन संपवत न्यायाची मागणी करावी लागल्याने ग्रामस्थांनी युवतीचे पार्थिव ॲम्बुलन्स मधून पोलीस स्टेशन पुढे आणत पोलिसांच्या कामगिरी विरोधात संताप व्यक्त केला होता.
आज रविवारी सकाळपासून पुन्हा सांगवी ग्रामस्थांनी आपला मोर्चा शिरवळ पोलीस स्टेशन कडे वळवला. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी ग्रामस्थांनी प्रमुख मागणी करत पोलीस स्टेशनच्या हद्दीत ठिय्या आंदोलन सकाळपासून सुरू केले होते. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे ठिय्या आंदोलन पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर दुपारी २:१५ वाजता सांगवी ग्रामस्थांनी मागे घेतले. हे ठिय्या आंदोलन तब्बल ४ तास चालू होते. यामुळे शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पिडीत युवतीला न्याय न मिळाल्यास सावित्रीबाई फुले यांच्या जयंती (३ जानेवारी) दिवशी रास्ता रोको करणार असल्याचे सांगवी ग्रामस्थांनी सांगितले.