जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता; धर्मिक दृष्ट्या या तिथीचे महत्त्व जाणून घ्या
जेजुरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा म्हणजेच खंडेराया यांना चंपाषष्ठी तिथी समर्पित आहे. दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी तिथीला साजरा केला जातो. त्यानुसार आज सोमवार (१८ डिसेंबर) रोजी चंपाषष्ठी आहे.
या दिवशी भगवान खंडेरायाची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी पूजेत वांगी अर्पण केली जातात. त्यामुळे याला वांगे छठ असेही म्हणतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हे व्रत केले जाते. महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यानुसार जाणून घेऊया जेजुरी यात्रोत्सवाचे महत्त्व.
महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत खंडोबा आहे. त्यामुळे हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी ‘मल्हारी नवरात्री’ ला प्रारंभ होतो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठीपर्यंत सहा दिवस हा उत्सव असतो. या उत्सवाला ‘खंडोबाची नवरात्र’ असे म्हणतात. जेजुरीत या उत्सवाचा जल्लोष वेगळाच असतो.
पौराणिक कथेनुसार, मणिसुर आणि मल्लासुर नावाचे दोन राक्षस होते. या राक्षसांनी अन्याय अत्याचाराची हद्द पार केली होती. या राक्षसांनी मानव, देव आणि ऋषींना खूप त्रास दिला. हा त्रास असहय्य झाल्याने ऋषींनी भगवान शंकरला साकडे घातले. त्यानंतर भगवान शंकराने भगवान खंडोबाचे रूप धारण करत मणि आणि मल्ल यांना पराजित केले. भगवान खंडोबा आणि राक्षसांचे हे युद्ध सलग सहा दिवस सुरु होते. या भीषण युद्धात मणिने भगवान शिवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला. या विजयाचा आनंद म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते. धर्मिक दृष्ट्या या तिथीला मोठे महत्त्व आहे.
पौराणिक कथेनुसार, ‘मणि आणि मल्ल’ या दैत्यांचा पराभवामुळे ऋषिमुनी आनंदी झाल्यानंतर त्यांनी खंडेरायाचा जयजयकार केला होता. त्याचेच प्रतीक ‘तळी भंडारा’ आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात चंपाषष्ठीला तळी भरली जाते. यात ताम्हणात विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा आदी साहित्य घेऊन तीन, पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये घरातील पुरुष मंडळीनी एकत्र येत ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’ च्या गजरात ही तळी वर खाली उचलतात. त्यानंतर जमीनावर पान ठेवून तळी ठेवली जाते. देवाला भंडार वाहिला जातो. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात तळी उचलली जाते. शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते. आरती करून भंडारा आणि गुळ-खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो. जेजुरीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत याठिकाणी यात्रोत्सव असतो. खंडेराया हे अनेकांचे कुळदैवत आसल्याने महाराष्ट्रसह इतर राज्यातील भाविक या दिवशी जेजुराला येवून खडेरायाचा आशीर्वाद घेतात.