पुणे तेथे काय उणे! लंडन-पुणे विमान प्रवसात अभियंत्याचे साडेसात लाखांचे दागिने लंपास
वाकड : तुम्ही बसस्थानक, रेल्वे स्थानक येथून चोरी झाल्याच्या घटना नेहमीच ऐकल्या असेल. मात्र, विमानात देखील चोरी होणे या प्रकारांवर तुमचा विश्वास बसणार नाही.
पण हे झाले आहे. लंडन ते पुणे विमान प्रवसात एका अभियंत्याचे तब्बल साडेसात लाख रुपयांच्या दगिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या प्रकरणी पुण्यातील वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सचिन हरी कामत (वय ४४, रा. वाकड, मूळ लंडन) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ ते ११ डिसेंबर २०२३ या कालावधीत लंडन ते पुणे या दरम्यान घडली.
सचिन कामत हे संगणक अभियंता आहेत. ते लंडन येथे एका संगणक कंपनीत काम करतात. पुण्यात एका नातेवाइकाच्या लग्नासाठी ते येत होते. लंडन ते मुंबई ते जेट्टी या विमान प्रवासाने ते पुण्यात येणार होते. लंडन येथून निघताना त्यांनी त्यांच्या सामानाच्या चार पिशव्या सीलबंद न करता सौदिया एअरलाईन्सकडे दिल्या होत्या. त्या चार पिशव्यांमध्ये त्यांनी कपडे, अत्तर, चॉकलेट, इलेक्ट्रिक उपकरणे आणि १५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते.
दरम्यान, कामत हे मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना त्यांच्या पिशव्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पिशव्यांचे ओळखपत्र मुंबई विमानतळ येथे जमा केले. त्यानंतर एका कुरिअर कंपनीद्वारे त्यांना त्यांच्या पिशव्या वाकड येथे मिळाल्या. दरम्यान, त्यांनी त्यांच्या पिशव्या तपासून पाहिल्या असता, त्यात त्यांचे ७ लाख ६० हजारांचे दागिने दिसले नाहीत. यामुळे त्यांनी थेट वाकड पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.