सराईत गुन्हेगार, जुगार, मटका, हातभट्टी, दारू विक्री सारख्या अवैध धंदे करणाऱ्या वीस जणांची शिरवळ पोलिसांनी काढली धिंड
शिरवळ : शिरवळ पोलीसांनी आज गुरुवार (दि.२१ डिसेंबर) रोजी हातभट्टी, दारु विक्री करणारे, मटका व्यवसायिक व सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले व शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संबंधितांची असणारी दहशत मोडीत काढण्याकरीता व नागरिकांमध्ये भितीमुक्त वातावरण निर्मितीकरीता त्यांची धिंड काढली. या सर्व जणांची शिरवळ पोलीस स्टेशन परिसर, एसटी बसस्थानक परिसर, मेनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शासकीय विश्रामगृह, चावडी चौक, बाजारपेठ, रामेश्वर परिसर अशी धिंड काढली.
शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे करणा-यांना शिरवळ पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे. शिरवळ पोलीसांनी कडक धोरण अवलंबत सराईत गुन्हेगारांसह अवैध धंदे करणाऱ्या वीस जणांची शिरवळसह परिसरातून धिंड काढल्याने अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख,अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या निर्देशानुसार शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्यासह शिरवळ पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली.