“आई जेवू घालेना आणि बाप भिक मागू देईना” वेल्ह्यातील आर्त तरुणाईची वेदना. भाग -२
वेल्हा : महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचा पाया, मावळ प्रांत म्हणून अभिमानाने भगवा खांद्यावर घेऊन फडकवत उभा असणारा असा हा वेल्हा तालुका आज मात्र मागास यादीत आपलं स्थान दिवसेंदिवस अधिकच बळकट करताना दिसतोय.
असंख्य मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर लढत स्वराज्याच्या इतिहासाचं एक एक पान निर्माण करत प्राणाची आहुती देणारे वीर ह्याच वेल्हे तालुक्यातील. स्वराज्याचे तोरण ज्या किल्ल्यावर बांधले तो तोरणा किल्ला ह्याच वेल्हे तालुक्यातील. प्राचीन मंदिरे ही सुद्धा ह्याच वेल्हे तालुक्यातील. शत्रूच्या काळजात धडकी भरविणाऱ्या अभेद्य असा राजगड किल्ला सुद्धा या वेल्हे तालुक्यातीलच. इतिहासाचा खूप मोठा वारसा या वेल्हे तालुक्याला, परंतु ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या परिपूर्ण असताना देखील कोणतेही ठोस विकासात्मक निर्णय घेतले गेले नाहीत. यामुळे पर्यटक या ऐतिहासिक ठेवा असलेल्या वेल्हा तालुक्याकडे पाठ फिरवताना दिसतात.
तालुक्यातील प्रत्येक गावातील तरुणाईला गावाच्या तालुक्याच्या सक्षमी करणासाठी वेळ देण्याची खूप इच्छा असताना दळण-वळण आणि आर्थिक समस्येमुळे स्थलांतराची वेळ तरुणाई वर आली आहे. स्वतःची आर्थिक समस्या सोडवावी का गावात थांबून गावाच्या तालुक्याच्या विकासात योगदान द्यावे अशी अवस्था झालेल्या वेल्ह्यातील तरुणाईला “आई जेवू घालेना आणि बाप भिक मागून देईना” अशा विवंचनेत दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. आजही शिवकालीन पद्धतीने जगणाऱ्या वेल्हे तालुक्यात विकास गंगा का पोहोचू दिली नाही? यांची चर्चा तरुणांकडून ग्रामस्थांनकडे वर्तवली जात आहे.
आजही दळणवळणासाठी असलेल्या प्रमुख रस्त्यांची अवस्था खराब आहे. तालुक्यातील जनतेलाच या रस्त्यावरून प्रवास करताना रोज संघर्ष करावा लागतो. तालुक्यातील जनतेचेच हे हाल असतील तर पर्यटक या ऐतिहासिक गोष्टींकडे कसा वळणार? तालुक्यात शासकीय प्रवासाच्या सोयी कमी असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी राहण्याची तरुणाई वर वेळ आली. काही लोक तर नोकरीच्या ठिकाणीच स्थायिक झाले आहेत. या समस्येमुळे मतदानाचा टक्का सुद्धा या वेल्हे तालुक्यात घसरला आहे. स्थलांतरीत झालेल्या युवा पिढीमुळे तालुक्यातील काही गावे वृद्ध आई वडीलांची किंवा वृद्ध आजी आजोबांची झाली आहेत. बहुतेक गावात युवा पिढी सक्रिय नसल्यामुळे गावाचा विकास खोळंबला आहे. एकंदरीत दळण वळणाच्या समस्येचा तालुक्यावर खूप मोठा परिमाण होताना दिसत असल्याची चर्चा तालुक्यात वर्तवली जात आहे.
तालुक्यातील काही ठिकाणी तर पावसाळ्यात शाळेतील मुलांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करून शाळेत जावे लागते. अनेकदा पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह हा खूप तीव्र असतो. त्यामुळे दोन ते तीन महिने विद्यार्थ्यांना घरीच बसावे लागते. तालुक्यातील काही भागात रस्ता आणि पुल नसल्यामुळे गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना आजारी पडल्यास झोळीत टाकून उचलून दवाखान्यात घेऊन जावे लागते. हे तालुक्यातील मन सुन्न करणारे वास्तव आहे. तालुक्यातील जनतेला रोजच तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र ना राजकीय नेत्यांना त्याची तमा ना अधिकाऱ्यांना सोयरसुतक असे वेल्हे तालुक्यातील जनतेची अवस्था असल्याची चर्चा गावा गावात आहे. रस्ते व दळण वळणाची साधने यामधे जो पर्यंत सुधारणा होत नाही, तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या २६ वर्षे राजधानी असणारा हा वेल्हे तालुका दुर्लक्षित व लोकांना माहीत नसलेलाच राहणार, हे मात्र त्रिवार सत्य आहे.