पुणे विद्यापीठाचा एम.बी.ए. प्रथम सत्राचा पेपर फुटला ; विद्यापीठाकडून पेपर रद्द
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.बी.ए.च्या परीक्षेदरम्यान शुक्रवार (दि. २२ डिसेंबर) राेजी एम. बी.ए. २०१९ रिव्हाईज प्रथम सत्रातील पेपर क्र. १११ लिगल अस्पेक्टस ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या प्रकाराची गंभिर दखल घेत शुक्रवारी (दि. २२डिसेंबर) राेजीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच या विषयाची परीक्षा पुन्हा २६ डिसेंबर राेजी सकाळी १० ते १२.३० या कालावधीत घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ११ वाजता पेपर सुरु होणार होता. पण त्याअगोदर पेपर फुटल्याचे निदर्शनास आल्याने पेपर रद्द करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर,२०२३ हिवाळी सत्राच्या परीक्षा या दि. २१ नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू आहेत. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा या त्यांच्या सत्रपूर्तता कालावधीनुसार आयोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये एम.बी.ए. अभ्यासक्रमाची परीक्षा दि. ११ डिसेंबर पासून सुरु झाल्या आहेत. शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी प्रथम वर्ष एम.बी.ए. २०१९ रिव्हाईज, प्रथम सत्रातील पेपर क्र. १११- लिगल अस्पेक्टस ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका एका परीक्षा केंद्रामधून प्रसारित झाल्याचे काही समाजमाध्यमांवरून दिसून आलेले आहे.
परीक्षांची संवेदनशीलता, गोपनीयता व पावित्र्य लक्षात घेता शुक्रवार दि. २२ राेजीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या विषयाची परीक्षा दि.२६ डिसेंबर राेजी सकाळी १०.०० ते १२.३० या वेळेत आयोजित केली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. महेश काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.