मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पुणे-सातारा महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत गॅस भरलेला टँकर पलटी
किकवी : पुणे-सातारा महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत बुधवार दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव चाललेला गॅस टँकर मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. टँकर मध्ये गॅस भरलेला होता सुदैवाने अपघातात टाकी लिकेज न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
कोचिन येथून निघेलेला एलपीजी गॅस भरलेला टँकर क्र. एन एल ०१ ए बी ७५२३ गुजरात येथे जात असताना बुधवारी सायंकाळी पुणे सातारा महामार्गावर किकवी (ता. भोर) गावच्या हद्दीतुन जात असताना टँकर वरील मद्यधुंद चालक पूर्ण नशेत असल्यामुळे त्याचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने टँकरची डावी चाके महामार्गाच्या डाव्या बाजुच्या कठड्यावर गेली. त्यामुळे टँकर महामार्ग आणि सर्व्हिस रोड मधील चारीत पलटी झाला. सुदैवाने या अपघातात टँकर चालक किरकोळ जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि महामार्ग वाहतुक पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या रस्त्यावरील वाहतुक सेवा सुरळीत करून रस्ता मोकळा केला. तसेच पोलिसांनी सुरक्षिततेसाठी अग्निशामक बंब घटनास्थळी तैनात ठेवला होता.
टँकरमध्ये सुमारे १९ टन एलपीजी गॅस भरलेला होता. वेगात टँकर पलटी झाल्यावर सुदैवाने टँकरची गॅस टाकी लिकेज झाली नाही. अन्यथा महामार्गवर मोठा अनर्थ घडला असता. गॅस लिकेज होऊ नये व सुरक्षित टाकी सरळ व्हावी, यासाठी एलपीजी कंपनीचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आले होते.