राज्याच्या शैक्षणिक धोरणात मोठा बदल, नर्सरीत प्रवेशासाठी किमान वय ३ वर्षे आवश्यक
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्य सरकारने शाळेत प्रवेश घेण्याच्या वयात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्ये नर्सरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आता मुलाचे वय किमान ३ वर्षे असणे आवश्यक आहे.
सध्या आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असताना राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्षे वयाच्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शाळेत प्रवेशाचे नियम NEP २०२० च्या नियमांनुसार असावेत हे निश्चित करण्यासाठी राज्य एक धोरण तयार करत आहे. NEP नुसार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करताना मुलाचे वय ६ वर्ष असावे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३ वर्षे पूर्ण केलेल्या मुलाला नर्सरीमध्ये जाण्याची परवानगी होती. त्यामुळे २.५ वर्षे वयाची अनेक मुलेही नर्सरीमध्ये दाखल होती होती. परंतु आता तसे करता येणार नाही. त्यामुळे मुल पहिलीत पोहोचेल तेव्हा ते ६ वर्षांचे असणार आहे.
प्राथमिक शिक्षण मंडळाचे राज्य अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, “आम्ही प्रवेशासाठी नवीन वयोमर्यादा धोरणावर काम करत आहोत. आम्ही लवकरच नवं धोरण जाहीर करू आणि ते शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी लागू होईल. नव्या धोरणात विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील तेव्हा वयाचा निकष ३ वर्षांपर्यंत ठेवण्यात येणार आहे. हे नवीन आंगणवाड्या हाताळणाऱ्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे” असे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान अर्ली चाइल्डहूड असोसिएशनने (ECA) राज्य सरकारने नर्सरीमध्ये प्रवेश करणाऱ्या चिमुकल्यांच्या प्रवेशाच्या वयात बदल करण्याची मागणी केली आहे. ECA ने राज्यपाल रमेश बैस यांना एक पत्र लिहून यात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारला बालवाडीत प्रवेश करण्यासाठी किमान वय तीन वर्षे घोषित करण्याची मागणी ECA कडून करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP २०२०) धर्तीवर ECA सदस्यांनी सांगितले की महाराष्ट्र हे अशा मोजक्या राज्यांपैकी एक आहे जिथे प्रवेशाचे वय बदलले नाही. यामुळे अनेक मुले ५ किंवा ५.२ वर्षे वयाचे असतानाच पहिलीच्या वर्गात पोहोचतात.
अर्ली चाइल्डहूड असोसिएशनच्या अध्यक्षा स्वाती पोपट वत्स म्हणाल्या की, “वयाच्या ३ वर्षापूर्वी पाळणाघरात, अंगणवाडीत किंवा नर्सरीमध्ये गेल्यामुळे मुलांवर दीर्घकालीन नकारात्मक प्रभाव पडेल. नर्सरीसाठी तयार केलेला अभ्यासक्रम ३ वर्षांच्या मुलाच्या चांगल्या प्रकारे संशोधन केलेल्या विकासात्मक क्षमतेच्या अनुरूप आहे. परंतु ३ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं शिक्षणात संघर्ष करू शकतात. सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार मुलाने ३१ डिसेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण केली पाहिजेत. परंतु शाळा एप्रिल किंवा जूनमध्ये सुरू होतात आणि याचा अर्थ असा होतो की मुले नर्सरी सुरू करतात तेव्हा अडीच वर्षे आणि इयत्ता पहिलीत असताना ५.५ वर्षे असतात” असे देखील त्या म्हणल्या.