“आरोग्य व्यवस्थेची झाली दैना, वेल्ह्याकडे कोणी लक्षचं देई ना”! आधुनिक पुणे जिल्ह्याचा असाही चेहरा भाग-३
वेल्हा : वेल्हा (राजगड) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकिय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.२६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी असण्याबरोबरच राजाराम महाराजांचा जन्म आणि सईबाईंचा मृत्यू अशा महत्त्वाच्या घटना सदर किल्ल्यावर घडल्या आहेत. ऐतिहासिक चळवळीचा केंद्रबिंदू असलेल्या वेल्हे तालुक्याची सर्वच बाबतीत आत्ताची अवस्था खूप दयनीय आहे.
तालुक्यातील आरोग्यव्यवस्थेची चिरफाड केल्यास आपला देश, प्रदेश “हेल्थ इज वेल्थ” बाबतीत किती पुढारलेला आहे याचं आँखो देखा हाल दिसतेच. तालुक्याची आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. तालुका आजही चांगल्या आरोग्यसुविधांपासून कोसो दूर आहेत. गावपाड्यांकडे जाणारी पायवाटही चिखलगाळाची असल्यानं या मार्गावर रुग्णवाहिका नाही तर डोली करून आरोग्य केंद्र गाठणे इतकाच पर्याय आहे. आजही तालूक्यात अर्धा पेक्षा जास्त साधे मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही. मग वैद्यकीय सुविधा तर लांबच राहील्या. आजही आठरागाव मावळातून किंवा सह्याद्रीच्या डोंगर द-यांच्या गावातील कोणी आजारी पडला किंवा एखादा पर्यटक पडला तर त्याला खांद्यावर किंवा डोली (डालात) घालून चार खांदेकरी करून प्रेता सारखे आनावे लागते.
तालुक्यातील काही भागात चांगले रोड नाहीत, त्यामुळे गाडी येण्यास विलंब होतो. कित्येक महिलांच्या तर गाडी येण्यास विलंब झाल्यामुळे घरातच प्रसूती झाल्या आहेत. परिणामी काही महिला दगवल्याही आहेत. वेल्हे तालुक्यातील हे खूप भयानक वास्तव कोणी नाकारू शकत नाही. वेल्हेपासून २० किलोमीटरवरील दुर्गम भागतील आठरा गाव मावळ भागासाठी इंडो–जर्मन प्रकल्पातंर्गत १९९२ मध्ये लाखो रूपये खर्च करून सुसज्ज आरोग्य केंद्र महिला प्रसुती गृहासह बांधण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान सुध्दा बांधण्यात आली आहेत. परंतु, वेल्ह्यातील शासकीय अधिकारी सोयी सुविधां अभावी वेल्ह्यात राहत नाहीत. वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून एक दोनदाच ठराविक वेळ येऊन निघून जातात, असे ग्रामस्थ सांगतात. तालुक्यात कोणताही मोठा दवाखाना नसल्यामुळे आपत्कालीन प्रसंगी पुणे शहरा शिवाय पर्याय नाही. तालुक्यात असणाऱ्या पॅथॉलॉजी- सोनोग्राफी सेंटरचीच अवस्था दयनीय आहे. तर एक्स-रे-एमआरआय सेंटर खूपच लांब राहिले.
सरकारी रुग्णालय गरीब रुग्णांसाठी एकमेव आशेचा किरण असते. महागड्या वैद्यकीय सुविधा न परवडणारी तालुक्यातील बहुतेक गरीब कुटुंबे सरकारी रुग्णालयांत आपल्या कच्च्या-बच्च्यांवर चांगले उपचार होतील, या आशेपोटी येत असतात. परंतु मागील काही दिवसांत तोरणा खोऱ्यातील पासली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाईच डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करीत असल्याचा अतिशय संतापजनक प्रकार समोर आला होता. त्या संदर्भात आम्ही बातमी ही प्रसारित केली होती. ढिम्म सरकारी यंत्रणा कार्यरत करायची असेल, तर राजकीय नेतृत्वात तशी इच्छाशक्ती असावी लागते. पण, नेतृत्वच जर असंवेदनशील असेल, तर यंत्रणेचे फावते. येथेही हाच अनुभव येत आहे. त्यामुळे आपल्या देशात ब्रिटिश असले नि नसले काय आपण आजही मूलभूत सोयीसुविधांमध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार अशा अनेक बाबतींत पारतंत्र्यातच आहोत. अशी तालुक्यात कायम चर्चा असते.
माझ्या मतदारसंघातील सर्व रुग्णालये बदलत्या आधुनिक युगात सुसज्ज, सर्व सुविधांनी युक्त आहेत. मी माझ्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवेचे दरसाल ऑडिट करतो का? याचं उत्तर कोणता जनसेवक, लोकप्रतिनिधी छाती ठोक पणे पुढे येऊन सांगेल? हा यक्षप्रश्न तालुक्यातील जनता विचारीत आहे.
"ही आहे आपल्या वेल्हे तालुक्याची अवस्था, ना प्रशासनाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधींचे लक्ष, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, लाईट अशा पायाभूत सुविधाही वेल्हेतील नागरिकांना मिळत नाही. याला जबाबदार कोण? याचा विचार नागरिकांनी करण्याची वेळ आली आहे. हे असेच चालू राहिले तर, वेल्हे तालुका मागास तर आहेच पण भकास व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही"
-संतोषआप्पा दसवडकर (मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष)