जेजुरीतील गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त
जेजुरी : जेजुरी (ता. पुरंदर) हद्दीतील आयएसएमटी कंपनीसमोरील झाडा-झुडपात सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर जेजुरी पोलिसांनी छापा टाकून ती उद्ध्वस्त केली आहे. या छाप्यात सुमारे २ लाख रुपये किमतीचे दारू तयार करण्यासाठीचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वी अंकुश राठोड (वय २२ वर्ष) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश नांदे यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसएमटी कंपनीच्या समोर झाडा-झुडपांनी वेढलेले ठिकाण आहे. त्या ठिकाणी शक्यतो कोणाचीच वर्दळ नसते. याच ठिकाणी पृथ्वी राठोड याने बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्याची भट्टी उभारली होती. याबाबतची गोपनीय माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, सर्जेराव पुजारी व पथकाने त्या दारूभट्टीवर छापा टाकला. यावेळी सुमारे २ लाख रुपये किमतीचे साडेपाच हजार लिटर कच्चे रसायन, भांडी, सरपण, दीडशे लिटर तयार दारू आढळून आली हे सर्व साहित्य पोलिसांनी नष्ट केले आहे.