महाराष्ट्राच्या महानंदवर अखेर गुजरातमधील मदर डेअरीचा ताबा; दूध संघाची शिखर संस्था अखेर इतिहास जमा होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई म्हणजेच महानंद या संस्थेवर गुजरातच्या मदर डेअरीनं ताबा मिळवला आहे. त्यामुळे ही संस्था आता इतिहास जमा झालेली आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. ही प्रक्रिया २ मे ला पूर्ण झाली आहे. मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी २५३ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे.

महानंदवर मदर डेअरीनं ताबा मिळवला असून मदर डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळातर्फे चालवली जाते. महानंदची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी मदर डेअरीला चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता. महानंद दूध ही राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेत होता. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्यावरुन एकमेकांवर आरोप केले होते.

२५३ कोटीची राज्य सरकार करणार मदत
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि महानंद यांच्यावतीनं पुनरुज्जीवनासाठी २५३.५७ कोटी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राज्य सरकारने या प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून २५३ कोटीची मदत केली जाणार आहेत.

Advertisement

महानंदला २००४ नंतर उतरती कळा
महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई या संस्थेची स्थापना ९ जून १९६७ रोजी करण्यात आली होती. राज्यातील दूधसंघांची शिखर संस्था म्हणून या दूध संघाची ओळख होती. महानंद ही संस्था २००४ पर्यंत फायद्यात होती. मात्र, यानंतर राज्यातील दूध संघांनी स्वत:च्या नावाच्या ब्रँडनं दूध विक्री सुरु केली. यानंतर महानंदला उतरती कळा लागली. २००४ नंतर पुढील अवघ्या १२ वर्षांच्या काळात म्हणजेच २०१६ पर्यंत महानंद सुरु राहणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.

फेब्रुवारीत महानंदच्या संचालक मंडळाचे राजीनामे
महानंद संस्था एनडीडीबीब म्हणजेच राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्यामध्ये प्रमुख अडसर हा महानंदचे संचालक मंडळ हा होता. गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळानं महानंदला संचालक मंडळ नको असल्याबाबतची अट घातली होती. त्यानुसार फेब्रुवारीत महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह संचालक मंडळानं राजीनामा दिला होता.

महानंदवरुन आरोप-प्रत्यारोप
महानंदच्या हस्तांतरण प्रक्रियेवरुन राजकारण रंगलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत महानंदच्या अध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळं ही स्थिती ओढवल्याचं म्हटलं होतं. तर, राजेश परजणे यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page