राजगड पोलीसांनी हद्दीतील सराईत गुन्हेगारास पकडुन येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे केले स्थानबध्द; नवनियुक्त पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची कामगिरी
नसरापूर : राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार निहाल रविंद्र कुंभार (वय २५ वर्षे, रा. करंदी खेडेबारे, ता. भोर) हा गेली २ वर्ष राजगड पोलिसांच्या “हातावर तुरी” देत होता. राजगड पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर विविध गुन्ह्याच्या नोंदी आहेत. या गुन्ह्यांखाली निहाल कुंभार यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव १९ जुलै २०२२ रोजी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्फत सादर करण्यात आला होता. राजगड पोलिसांनी त्याचा कसून तपास करूनही तो त्यांच्या हाती लागत नव्हता.
नुकतेच धडाकेबाज पोलीस निरीक्षक म्हणून ओळख असलेल्या दिलीप पवार यांनी राजगड पोलीस स्टेशन चा चार्ज घेतला आहे. त्यांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला असता त्यांना काल मंगळवार (दि. ९ जानेवारी) रोजी निहाल कुंभार हा एका ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी लगेचच क्षणाचाही विलंब न करता पोलीस अंमलदार एस.यु.ढावरे, अजित माने, भगिरथ घुले यांचे एक पथक तयार करून सदर ठिकाणी पाठवले. या पथकाने उत्कृष्ठ कामगिरी करून सराईत गुन्हेगार निहाल कुंभार यांस ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी, पुणे यांच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे योग्य त्या पोलीस बंदोबस्तात जमा केले. या कारवाई मुळे राजगड पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.