मुळशीत आढळले कोरोनाचे पाच रुग्ण
मुळशी : कोरोनाच्या नवीन व्हेरीअंटचा सामना करण्यासाठी मुळशी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. अँटीजन चाचणीतून पाच रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुळशी तालुक्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० वर्षांवरील रुग्ण, तसेच श्वसनाचे विकार असणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
रोजचे संशयित रुग्णाचे नमुने अँटीजन चाचणी व आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी पाठवण्यात येत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील ५६ रुग्णांची अँटीजनआणि चार रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.
अँटीजन चाचणीतून पौडमध्ये दोन, दारवली, विठ्ठलवाडी आणि असदे या तीन गावांत प्रत्येकी एक कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्व रूग्ण वयाची चाळिशी पार केलेले आहेत. तथापि त्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्यांचे योग्य निदान होईल. सध्या ते क्वारंटाईन असून, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांची शरीरप्रकृती ठणठणीत आहे.
खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांना संशयित कोविड रुग्णांना प्रोटोकॉलनुसार उपचार करण्याबाबत, तसेच रुग्णांना आरोग्य शिक्षण देण्याबाबत आवाहन केल्याचे डॉ. लोहार यांनी सांगितले. पौड ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. मीना इसवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा संगई या रुग्णांवर उपचार करतात.
नागरिकांनी घाबरून न जाता पुरेशी काळजी घ्यावी. गर्दीत जाणे टाळून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाची लक्षणे असल्यास तत्काळ दवाखान्यात उपचार घ्यावा. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
- रणजित भोसले, तहसीलदार