पुणे जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत धरणांत ६५.५९ टीएमसी साठा कमी; पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासण्याची शक्यता
पुणे : पावसाळा संपून जवळपास तीन महिने होत आले आहे. या कालावधीत धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील धरणांत १२०.६४ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ६५.५९ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.
जिल्ह्यात एकूण २७ धरणे आहेत. सर्व धरणांची एकूण क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. यंदा सर्व धरणे मिळून १६८.६४ टीएमसी म्हणजेच ६० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यापैकी सध्या १२०.६४ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी याच काळात या धरणांत १८६.२३ टीएमसी म्हणजेच ९३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ६५.५९ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.
येत्या काळात पाण्याचा वापर वाढणार असून, पाणीपातळी कमी होणार आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असण्याची चिन्हे असल्यामुळे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात कमीअधिक पाऊस पडला. तर बारामती, पुरंदर भागांत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. परंतु सप्टेंबर अखेरीस झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे.
सध्या मुठा खोऱ्यातील धरणांत २२.१९ टीएमसी म्हणजेच ७६ टक्के पाणीसाठा आहे. तर नीरा खोऱ्यातील धरणांत ३४.६० टीएमसी म्हणजेच ७१ टक्के पाणीसाठा आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांत २८.६२ टीएमसी म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.