कासवरील निसर्ग पर्यटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जीप सफारीतून मिळतेय अनाेखा अविष्कार पाहण्याची संधी
सातारा (प्रतिनिधी) : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर फुलणारी विविध प्रजातीची फुले पाहण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटक या फुलांच्या पंढरीला भेट देत असतात. या ठिकाणी दुर्मिळ वनस्पती बरोबर अनेक निसर्गाची रुपे सुद्धा पाहायला मिळतात. कास पठारचा हंगाम संपल्यानंतर कास पठार कार्यकारी समिती कास पठारावर बारमाही पर्यटन सुरू राहावे, यासाठी वन विभागाच्या सहकार्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून कास पठारावर असणारी निसर्गाची अदभुत रूपे, गुहा, तळी, काही रहस्यमय ठिकाणे पाहण्याची संधी पर्यटकांना कास पठार समिती आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून गेल्या आठवड्याभरात या ठिकाणी बऱ्याच पर्यटकांनी भेट देऊन कास पठारावरील दिसणारी निसर्गाचे विविध रूपे, रहस्यमय ठिकाणे पाहून समाधान व्यक्त केले.
कास पठार कार्यकारी समितीने वनविभागाच्या सहकार्याने कास पठारावर निसर्ग पर्यटन सुरू केले आहे. निसर्ग पर्यटनात सुरू केलेले पॉईंट पायी चालत अथवा जीप सफारीतून सुद्धा अनुभवता येतात. जीप सफारीतून दिसणारी निसर्गाची अदभुत सफर आणि त्यात दऱ्या खोऱ्याची माहिती असणारे अनुभवी गाईड यामुळे जीप सफारीत बसून पर्यटक निसर्गाचा सुंदर आविष्कार अनुभवत आहेत. कास पठार समितीचे अनुभवी गाईड पर्यटकांना योग्य ती माहिती देत असल्यामुळे एक रोमांचक सफर घडत आहे.
सातारा जिल्ह्यात कास पठारावरील हे पॉइंट पर्यटकांसाठी एक पर्वणीच असून निसर्ग पर्यटनामुळे परिसरात पर्यटनाचे नवीन दालन खुले झाले आहे. त्यामुळे या परिसरातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पर्यटन प्रेमींनी निसर्ग अविष्कारचा लाभ घ्यावा, असे आव्हान कास पठार कार्यकारी समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.