शिरूर येथील मित्राचा खून करणाऱ्या मित्रास जन्मठेप
शिरूर : शिरुर (जि. पुणे) येथे हातउसने घेतलेले दहा हजार रुपये परत मागणार्या मित्राच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून करुन दुसर्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एकाला जन्मठेप व दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.
ही घटना २२ मार्च २०१८ रोजी दुपारी पावणे एक वाजता डंबेनाला, शिरुर येथे घडली होती. या प्रकरणी सचिन गुलाब धाडीवाल (वय ३८, रा. काचेआळी, शिरूर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार अमर रघुवीर बैशे (वय ३८), रा. रामलिंग रोड, पाबळ फाटा, शिरूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रशांत माळवे व अमर बैशे हे दोघे मित्र होते. अमर बैशे याने प्रशांत माळवे कडून दहा हजार रुपये हात उसने घेतले होते. तीन महिन्यांनंतर प्रशांत माळवे ते पैसे मागत होता. त्यावेळी अमर बैशे याने तुला संपवून टाकतो, असे म्हणत चाकूच्या सहाय्याने प्रशांत माळवेच्या पोटात वार केले.
प्रशांतला वाचवण्यासाठी सचिन धाडीवाल मध्ये पडले असता अमरने चाकूने धाडीवाल यांच्या हातावर व पाठीवर वार केले. प्रशांत जखमी होऊन खाली पडल्यावर अमर बैशे तेथून निघून गेला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु प्रशांत माळवे मृत्युमुखी पडला होता.