महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक; रश्मी शुक्लांच्या नियुक्तीची अखेर घोषणा, फोन टॅपिंगप्रकरणात ठरल्या होत्या वादग्रस्त; वाचा सविस्तर
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे.
जाणून घ्या फोन टॅपिंग प्रकरण
माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांचं नाव घेतलं जातं. रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागात आयुक्तपदावर असताना बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. फडणवीस सरकार सत्तेत असताना आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर देखील बेकायदेशीर फोन टॅप केले जात असल्याचा आरोप करण्यात आले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडं, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता.