एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना, अध्यक्षांचा निर्णय; शिंदेसह सर्व आमदार पात्र, उ.बा.ठा. गटाला मात्र मोठा धक्का

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. पण आता याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे. पक्ष हा बहुमताच्या आधारे ठरवला जातो आणि बहुमत हे शिंदे गटाकडे आहे असंही नार्वेकर म्हणाले. तर भरत गोगावले यांचाच व्हिप योग्य असल्याचा निकालही त्यांनी दिला. या निकालानुसार पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.

Advertisement

शिवसेना प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पदावरून काढण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार पक्ष चालवणे हे अयोग्य आहे. ठाकरे यांचे मत म्हणजे पक्षाचे मत नव्हे. पक्षप्रमुखापेक्षा राष्ट्रीय कार्यकारिणी मोठी आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेली प्रत ही शिवसेनेची खरी घटना आहे. १९९९ साली आयोगाकडे दाखल केलेली घटना वैध आहे. २३ जानेवारी २०१८ रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही. २०१८ साली करण्यात आलेले बदल ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.

नार्वेकर पुढे म्हणाले की, २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेत दोन गट पडल्याचं २२ जून रोजी लक्षात आले. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त विधान सभा अध्यक्षांना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. २१ जून २०२२ रोजी प्रतिस्पर्धी गट तयार झाला तेव्हा शिंदे गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष होता. असाही स्पष्ट निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे गटाकडून याचिकेत केल्या गेलेल्या दाव्यांवर नार्वेकरांकडून सवाल उपस्थित केले गेले आहेत. तर त्याला उत्तर देताना शिंदे गटाकडून सादर केलेली उत्तरं आणि पुराव्यांशी सहमत असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, शिवसेना नेतृत्त्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निकाल स्पष्ट आहे, पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होतं, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page