लवकरच बारामती लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करणार, अजित पवार समजूनच त्या उमेदवाराला मत द्या; काही लोक शेवटची निवडणूक म्हणतील, भावनिक करतील…पण; अजितदादांनी फुंकल बारामती लोकसभेचं रणशिंग, वाचा सविस्तर
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे २ गट पडले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे दोन्ही गट तयारीला सुद्धा लागले आहेत. त्यातच आज रविवारी(४ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकास कामांची पाहणी सुरू आहे. येथील एका कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपण बारामती लोकसभेसाठी उमेदवार देणार असल्याचे म्हणत मला समजूनच त्या उमेदवाराला मत द्या असं भावनिक आवाहन केलं आहे. तसेच आमचे वरिष्ठ शेवटची निवडणूक म्हणतील, भावनिक करतील पण, मतदारांनी भावनिक न होता विकासाच्या दृष्टीने विचार करून मतदानाचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हंटल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी बारामती लोकसभेचे रणशिंग फुंकले. अजित पवार म्हणाले, आजपर्यंत तुम्ही आपल्या वरिष्ठांचे ऐकलं, आता माझं ऐका…. अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे, असे समजून मी उभा केलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे. उद्या माझ्या विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान मोदींना सांगेन की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे. आपली कामं झाली पाहिजेच या दृष्टीने अडी-अडचणीला कोण मदत करतो याचा विचार करा.
अजित पवार पुढे म्हणाले, आपले वरिष्ठ म्हणतील ती आपली शेवटची निवडणूक आहे.. असं म्हणून ते लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही. त्यामुळे तुम्ही भावनिक होऊ नका आणि विकासाच्या दृष्टीने विचार करून मतदानाचा निर्णय घ्या. तुम्ही मला योग्य सहकार्य केलं तर पुढची कामं होतील, नाहीतर मी तुमची कामं करण्यास बांधील नाही असेही त्यांनी जनतेला स्पष्टपणे सांगितलं. अजित पवारांनी इतकं सर्व सांगताना आपला उमेदवार कोण असेल हे मात्र अद्यापही जाहीर केले नाही. परंतु त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा मुलगा जय पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं बोललं जात आहे.