आत्ता ट्रेलर दाखवलाय! खासदार निवडून द्या, पिक्चर दाखवतो; अजितदादांचे मुळशीकरांना आवाहन
मुळशी : पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभेची जागा महायुतीत अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाला मिळणार आणि तेथील उमेदवार सुनेत्रा पवार याच असणार हे आता जवळपास नक्की झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मतदारसंघात कामाला लागले असून त्यांनी पक्षाचे मेळावे तथा जाहीर सभा घेण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यांनी शनिवारी दुपारी भोर येथील सभा उरकून सायंकाळी मुळशी तालुक्याच्या घेतलेल्या मेळाव्यात पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त केला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील हा मेळावा घोटावडे फाटा येथे झाला. माजी नगरसेवक मयूर कलाटे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, पिंपरी-चिंचवडचे कार्यकर्ते, पदाधिकारी या मेळाव्याला खासकरुन उपस्थित होते. पुढील सभेसाठी जायचे असल्याने अजित पवार यांनी अगोदर भाषण केले. यावेळी त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे बटन दाबा. गेल्या कित्येक वर्षात न झालेली कामे पाच वर्षात करून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्री या नात्याने मुळशी तालुक्याला काही कोटींचा निधी देऊन मी फक्त ट्रेलर दाखवलाय, खासदार निवडून द्या, संपूर्ण पिक्चरच दाखवतो, असे ते म्हणाले.
शरद पवारांप्रमाणे त्यांनी मुळशीतील जुने कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी यांची नावे यावेळी अजितदादांनीही घडाघडा वाचून दाखवली. प्रत्येक निवडणुकीत स्टेजवर पहिल्या रांगेत बसणाऱ्या पांडुरंग राऊत यांचा त्यांनी खास उल्लेख केला. माझ्यावर कोणी टीका केली तरी चालेल पण ती मला कुणावर करायची नाही या त्यांच्या शब्दांतून काहीसा नरमाईचा निवडणुकीतील सूर यावेळी दिसला. केंद्रातील सत्तेसाठी गरज असलेला खासदार तुम्ही निवडून दिला पाहिजे. त्यासाठी आशीर्वाद घ्यायला आलो आहे, अशी साद त्यांनी घातली. तो निवडून आला तर तुमची कामे मोदी-शहांकडून करून आणतो हा माझा शब्द आहे, असे ते म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले की, मुळशीतील सुतारवाडीच्या पुढे ताम्हीणीला जातानाचा महामार्ग चार अथवा सहा पदरी करावा लागणार आहे. त्यासाठी या रस्त्यालगत बांधकामे करू नका. चांदणी चौक ते ताम्हीणी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कंत्राटदारच बंडलबाज निघाला आहे. पोमगाव येथील सुमारे सत्तर टक्के घरे पाण्याखाली जातील त्यामुळे तेथील लोकांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. आता सध्या कोणावर टीका करणार नाही. माझ्यावर कुणी कितीही टीका करा मी मात्र तुमचा विकासच करणार.’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
देशातील ६५ टक्के जनतेला मोदी हे पंतप्रधान म्हणून हवे असल्याचे सर्व्हेत दिसून आले आहे. तर त्यासाठी विरोधकांकडे पर्यायच नाही, असा टोला अजितदादांनी यावेळी लगावला. देशात पुन्हा ‘एनडीए’चं सरकार येणार असून मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. म्हणून त्यांच्या विचाराचा खासदार निवडून दिला तर विकासाची कामे होतील,असे ते म्हणाले. बेरजेचे राजकारण करा वजाबाकी करू नका, असा सल्ला त्यांनी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, रणजीत शिवतरे, विलास लांडे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा महिला अध्यक्षा मोनिका हरगुडे, प्रवीण शिंदे, राजेंद्र हगवणे, सुनील चांदेरे, अमित कंधारे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक उपस्थित होते.
या सभेच्या निमित्ताने तालुक्यातील तटस्थ गट काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागलेले होते. मात्र तालुक्यातील राष्ट्रवादीच्या तटस्थ गटाने अजित पवार यांच्या सभेलाही उपस्थित न राहता तटस्थ भुमिका घेतली.