पत्नीसह तिघांवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी पतीला अटक! सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील सलुन दुकानात घटनेचा थरार
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वर्दळीच्या नांदेड सिटी येथील डिस्टिंक्शन सेंटरमधील परफेक्ट युनिक्स सलुन दुकानात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास चित्रपटासारखे अंगावर शहारे आणणारे थरार नाट्य नागरिकांनी अनुभवले.
एका बेधुंद पतीने हातात धारदार चाकूने पत्नीला, तसेच तिच्या मदतीसाठी आलेल्या दोघांना चाकूने भोसकले. त्यात तिघांसह हल्लेखोर पतीही झटापटीत गंभीर जखमी झाला. चाकू हल्ल्यात सफाई कामगार महिला आरती वाल्मिकी (वय २३ वर्षे , सध्या रा. नांदेड सिटी, मूळ रा. बिहार) तसेच सलुन कामगार गणेश रामजी राठोड (वय ३२ वर्षे, रा. नांदेड सिटी) व सार्थक वसंत चरेकर (वय २२ वर्षे, सध्या रा. नांदेड सिटी, मूळ रा. पानशेत, ता. वेल्हे) जखमी झाले आहेत. हल्लेखोर पती खुदेय कैलास वाल्मिकी (वय ३२ वर्षे, सध्या रा. नांदेड सिटी, मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) हा गंभीर जखमी झाला आहे.
आरती वाल्मिकी या सलून दुकानात सफाईचे काम करत होत्या. तिचे बुधवारी रात्री तिच्या पतीबरोबर भांडण झाले. नेहमीप्रमाणे आरती गुरुवारी सकाळी सलून दुकानात सफाईसाठी आल्या होत्या. तिच्या पाठोपाठ तिचा पती खुदेय हा दुकानात आला. त्याने हातातील चाकूने आरतीवर वार केले. त्यावेळी तेथील कामगार सार्थक चरेकर व गणेश राठोड आरतीच्या मदतीसाठी पुढे आले. त्यावेळी खुदेय याने या दोघांवरही वार केले. या झटापटीत खुदेय हा खाली पडला. त्यात तोही गंभीर जखमी झाला. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, हवेलीचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पोलिस हवालदार किरण बरकाले, पोलिस नाईक अशोक तारू, राजेंद्रे मुंढे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे अधिक तपास करीत आहेत.