पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू; काळूबाई दर्शनासाठी जात असताना काळाचा घाला
सारोळे : कुटुंबासह काळूबाई दर्शनासाठी निघालेल्या एका व्यक्तीचा सारोळे (ता. भोर) गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी (दि. २९ नोव्हेंबर) सव्वा अकराच्या सुमारास घडली. उत्तम वामन झेंडे (वय ६० वर्ष, रा. वडकी, ता. हवेली) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झेंडे कुटुंबीय हे काळूबाई दर्शनासाठी वाई रस्त्याने जाण्यासाठी २ चारचाकी गाड्यांसह निघाले असताना पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीतील हॉटेल मल्हार समोर त्यातील एका गाडीचा टायर पंक्चर झाला. यावेळी मृत उत्तम झेंडे हे दुसऱ्या गाडीत पुढे निघून गेले होते. टायर पंक्चर झाल्याचा फोन येताच ते गाडीसह पुन्हा वळून आले. आणि रस्ता ओलांडत पलीकडे असलेल्या गाडी कडे जात असताना सातारा कडून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने(के.ए.२२ ए.ए.४३६३) त्यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांसमोर झालेल्या या अपघाताने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीस व आर. टी. ओ. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील ट्रक चालक मुगुटसाहब अब्दुल कादीर जयलानी सय्यद (वय २७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अंकुश राजाराम फाटे (वय ३८ वर्ष, रा. वडकी- तळेवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. याबाबतचा पुढील तपास पोलिस हवालदार नाना मदने करत आहेत.