पुणे-सातारा महामार्गावर हरीश्चंद्री गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी युवक जागीच ठार
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावर हरीश्चंद्री(ता.भोर) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१९ जानेवारी) रात्री ८ च्या सुमारास घडली आहे. राजगड पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाचे अंदाजे वय २५-३० वर्षे असून अद्याप पर्यंत या युवकाची ओळख पटू शकली नाही. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये मयत युवकाचा मेंदू बाहेर पडला होता. धडक देणारा अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे. याबाबत सागर रविंद्र गायकवाड वय (२३ वर्षे, ॲम्बुलन्स ड्रायव्हर रा. करंदी ता. भोर) यांनी राजगड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला. आजूबाजूच्या परिसरातील या वयोगटातील कुणी व्यक्ती बेपत्ता आसल्यास नातेवाईकांनी राजगड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे अवाहन राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनय झिंझुर्के यांनी केले आहे.
हरिश्चंद्री ब्रीजचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन
अजून किती नाहक बळी गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हरिश्चंद्री ब्रिजच्या कामाला सुरुवात करणार? या अपघातामुळे हरिश्चंद्री ग्रामस्थांच्या मनात अजून मोठी भिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी जर हरिश्चंद्री ब्रीज चे काम लवकर सुरू केले नाही तर मोठें जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.