पुरंदर मतदारसंघात ३० हजार बाेगस मतदार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा दावा; आयाेगाकडे तक्रार
पुणे : पुरंदर विधानसभा मतदारसंघात तीस हजारांहून अधिक बाेगस मतदार आहेत. याबाबत निवडणूक आयाेगाकडे तक्रार केली आहे. ही नावे वगळावीत अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. याच बाेगस मतदारांमुळे आपला पराभव झाल्याचा आराेपही त्यांनी केला आहे.
पुण्यात आयाेजित पत्रकार परीषदेत शिवतारे यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघातील बाेगस मतदारांच्या नावांचा विषय मांडला. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख प्रमाेद ऊर्फ नाना भानगिरे उपस्थित हाेते. भानगिरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील बाेगस मतदारांची संख्या अधिक असल्याचा दावा केला आहे.
शिवतारे यांनी काॅंग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यावर आराेप केले असून, ते म्हणाले, ‘ पुरंदर विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलुस कडेगाव या विश्वजित कदम यांच्या मतदार संघातील ३२ हजार ३६६ मतदारांची बोगस नावे आढळून आली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत विश्वजित कदम यांचे नातेवाईक संजय जगताप हे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जगताप आणि कदम यांनी २०१४ मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात सव्वा लाख मतदारांची बोगस नावे लावल्याने तल्कालीन उमेदवार अनिल शिरोळे यांनी आंदोलन देखील केले होते. ही बाेगस नावे वगळावीत अशी मागणी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. याच बोगस मतदारामुळे माझा पराभव झाला आहे.
निवडणूक आयोगाला याबाबतचे सर्व पुरावे सादर केले असल्याचे नमूद करीत शिवतारे म्हणाले, ” पुरंदर मतदारसंघात अशा मतदाराचे नाव कुठल्या केंद्रावर किती नंबरला आहे, यासोबतच कडेगाव पलुस मतदार संघात तो कुठल्या केंद्रावर किती क्रमांकाचा मतदार आहे, इथपर्यंत माहिती आयोगाला पुरवलेली आहे. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करण्याची कदम आणि जगताप यांची ही पहिलीच वेळ नसून याला कुठेतरी आळा बसावा यासाठी निवडणूक आयोगाने गंभीरपणे पावले उचलायला हवीत. ही नावे लावणारे मतदार नोंदणी अधिकारी आणि दुबार मतदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही मी केली आहे.” असं शिवतारे म्हणाले.