भोर येथे अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळा; जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आमदार संग्राम थोपटे यांचे आवाहन
भोर : भोर येथील अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. या सामुदायिक विवाह सोहळ्यास २००६ पासून सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजगड ज्ञानपीठच्या सचिव स्वरूपा थोपटे उपस्थित होत्या.
भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावर श्री क्षेत्र नारायणपूरचे नारायणमहाराज यांच्या उपस्थितीत २८ एप्रिल २०२४ रोजी हा सोहळा रंगणार आहे. या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा व खर्च वाचवावा, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या विवाह सोहळ्यातील वधुवरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल तसेच सर्वांची भोजनाची व्यवस्था अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर, वेल्हा, मुळशी यांच्या वतीने करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात सर्वधर्मियांचा सहभाग असेल. तसेच नवीन वधू-वरांसाठी लकी ड्रॉ मार्फत विविध बक्षिसे ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, या विवाह सोहळ्यात १०१ विवाह करण्याचे प्रयोजन असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले. विवाह नोंदणी करण्यासाठी मुलगा व मुलगी या दोघांचे दाखले घेऊन ९८५०८८०८३८, ९८२२७७०६६० आणि ९०११५३३१४२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच भोर, वेल्हा, मुळशीतील गरजू, गरीब, मुला-मुलींच्या पालकांनी स्वतः नावनोंदणी करावी, असे आवाहनही आमदार थोपटे यांच्यावतीने करण्यात आले आहे.