कात्रज भागात १२ लाखांचे मेफेड्रोन जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन जणांना ठोकल्या बेड्या

कात्रज : कात्रज भागात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ११ लाख ९० हजार रुपयांचे ५४ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. मल्लीनाथ बसवराज गौडगाव (वय २९, रा. चंद्रभागानगर, आंबेगाव, कात्रज), नौशाद अब्दुलअली शेख (वय ३६, रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कात्रज ते देहूरोड बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ दोघे जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे मेफेड्रोन सापडले. त्यांच्याकडून ५४ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. चौकशीत दोघांनी छत्रपती संभाजीनगरमधून मेफेड्रोन आणल्याचे उघडकीस आले.

Advertisement

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिणे, सहायक निरीक्षक समीर कदम, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अभिनय चौधरी, सागर बोरगे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारावकर यांनी ही कारवाई केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी कोंढवा भागात कारवाई करून एका तरुणाकडून ४० लाखांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page