वाघोलीत शिवरकर वस्ती जवळ २ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
वाघोली : पुण्यातील वाघोली या ठिकाणाहून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ असणाऱ्या खाणीत आज सोमवारी (२२ जानेवारी) दुपारी २ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पी एम आर डी ए अग्निशमन केंद्र वाघोली या ठिकाणचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासाच्या शोधकार्यानंतर एकाला स्थानिक लोकांच्या मदतीने तर दुसऱ्याला अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले. अली अहमद शेख (वय १२वर्ष) आणि कार्तिक दशरथ दुखरे (वय १२वर्ष) दोघेही राहणार वाघोली शिवरकर वस्ती ता.हवेली जि.पुणे या ठिकाणचे रहिवाशी होते.
वाघोलीत शिवरकर वस्ती येथे एक पाण्याची खाण आहे. या खाणीत ५ ते ६ मुले पोहण्यासाठी गेली होते. त्यात या दोघांचा आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दोघांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला असून शिवरकर वस्तीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.