सीताफळ लागवड करायचीय? भिवरी(पुरंदर) येथे २५ जानेवारीला शेतकरी बांधवांसाठी मोफत प्रशिक्षण
पुरंदर : भिवरी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि.२५जानेवारी) खते, कीड व्यवस्थापन, प्रक्रिया व विपणन व्यवस्थापन व सीताफळ उत्पादन प्रशिक्षणावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इतर फळांच्या तुलनेत सीताफळाच्या लागवडीसाठी पाणी आणि व्यवस्थापन खर्च कमी लागतो. बाळानगरी, गोल्डन, सुपर गोल्डन असे वाण महाराष्ट्रात उपलब्ध आहे. सीताफळाच्या लागवडीच्या प्रक्रिया प्रमाणित करणे, छाटणीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान सोप्या भाषेत मांडणे, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी यंत्रणा उभ्या करणे, अशा गोष्टींची गरज आहे. यासाठीच प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती कुंजीरवाडी भुदरगड नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब सोळांकुरे-पाटील यांनी दिली.
सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषि विभाग, पुणे व आत्मा विभाग, पुणे व भुदरगड नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनी (भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने सीताफळ-उत्तम कृषी पद्धती बाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामधे सीताफळ जातीची निवड कशी करावी? मशागतपूर्व झाडांची लागवड कशी करावी? झाडांची छाटणी कशी करावी? तसेच बहार येण्यासाठी ट्रिटमेंट कशी करावी? बहार आल्यानंतर पीक संरक्षणासाठी विविध उपाययोजना कशा कराव्यात? एकात्मिक अन्नद्रव्य नियंत्रण कसे करावे? विक्री व्यवस्थापन, सीताफळ प्रक्रिया उद्योग यासारख्या विविध बाबींवर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शेतकरी बांधवांना मोफत देण्यात येणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांना नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता नोंदणी करण्यात येईल.
या कार्यक्रमास अखिल भारतीय समन्वयित अंजीर आणि सिताफळ संशोधन प्रकल्पाचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. प्रदीप दळवे, डॉ.युवराज बालगुडे, पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अतुल कडलक, कृषी विभागाचे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार गोविंद हांडे यांचे प्रमुख मार्गदर्शन असेल, तर सदर कार्यक्रमास हवेली तालुका कृषी अधिकारी अनिल धुरगुडे, पुणे मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, पुणे विभागीय प्रकल्प उपसंचालक (मॅग्नेट) डॉ. राजेंद्र महाजन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, “आत्मा” चे (पुणे) प्रकल्प संचालक हिरेमठ तसेच पुणे एम.सी.डी.सी. विभाग प्रमुख दिगंबर साबळे यांची प्रमुख उपस्थिती असेल.