प्रकल्पग्रस्त व कुणबी जातीचा दाखल्याचा घोटाळा भोरमध्ये उघडकीस, प्रकल्पग्रस्ताच्या ९५ वर्षाच्या वारसदारावर आली स्वतःला सिद्ध करण्याची वेळ.
मंडल अधिकारीसह संबंधीत दोषींवर कारवाई होणार का?

भोर : भोर प्रांत कार्यालयात वंशावळीचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून भाटघर धरण प्रकल्पग्रस्त व कुणबी जातीचा दाखला मंडल अधिकारी यांच्या कृपेने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मूळ प्रकल्पग्रस्त वारसदारासह कुटुंबातील ८ जणांनी भोर प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ऋषिकेश संतोष दानवले(बारे बुद्रुक ता.भोर) याने एप्रिल २०२२ मध्ये कुणबी जातीचा दाखला मिळविण्यासाठी जोडलेल्या कुटुंबाच्या वंशावळीच्या प्रतिज्ञापत्रात महादू बाळा दानवले यांना शंकर महादू दानवले हा एकच मुलगा असल्याचे तर शंकर महादू दानवले यांना सहा मुले असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे नमूद केले होते. या अर्जा सोबत जोडलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यासाठी तहसीलदार भोर यांनी सुनील कांबळे (मंडलाधिकारी भोलावडे) यांना स्थानिक चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र मंडलाधिकारी यांनी गावातील पंच मंडळींसह स्थानिक चौकशी करण्याऐवजी अर्जदाराच्या कुटुंबातीलच बाळासाहेब दिनकर दानवले यांचीच पंच म्हणून सही घेऊन स्थानिक चौकशी अहवाल तहसीलदारांना सादर केला होता.

त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा याच अर्जदाराने प्रकल्पग्रस्त दाखला मिळविण्यासाठी अर्ज केला. या अर्जासोबत कुटुंबाच्या वंशावळीचे प्रतिज्ञापत्र जे की कार्यकारी दंडाधिकारी भोर यांच्यासमोर केले होते त्यात मूळ प्रकल्पग्रस्त महादू बाळा दानवले यांना दोन मुले असल्याचे नमूद केले होते. १) शंकर महादू दानवले व २) दिनकर महादू दानवले. तर शंकर महादू दानवले यांना बबन शंकर दानवले हा एकच मुलगा असल्याचे नमूद केले होते. मुळात महादू बाळा दानवले यांना पाच मुले आहेत, त्यांच्यापैकी पदू महादू दानवले (वय ९५ वर्षे) हे हयात आहेत. तर महादू बाळा दानवले यांचा मोठा मुलगा शंकर महादू दानवले यांनाही पाच मुले आहेत. मात्र याठिकाणी प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी केलेल्या प्रतिज्ञापत्रात हयात असलेले वारसदारांची माहिती जाणीव पूर्वक लपवली आहे तर कुणबी जातीच्या दाखल्यासाठी दिलेल्या वंशावळीत शंकर महादू दानवले यांना एक अधिकचा मुलगा दाखवून त्याच्या आधारे कुणबी जातीचा दाखला मिळविला आहे.

Advertisement

अर्जदाराने केलेल्या अर्जाची व कागदपत्रांची मंडल अधिकारी सुनील कांबळे यांनी शहानिशा न करता अर्जदारा सोबत संगनमताणे केवळ अर्जावरील माहिती व जोडलेल्या कागदपत्रांनुसार प्रकल्पग्रस्त व कुणबी जातीचा दाखला दिला असल्याचे दानवले कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यामुळे मूळ प्रकल्पग्रस्त महादू बाळा दानवले यांच्या ९५ वर्षाचे वारसदार पदु महादू दानवले यांना या वयात स्वतःला वारसदार म्हणून सिद्ध करण्यासाठी आटापिटा करावा लागत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्त दाखला मिळविण्यासाठी मूळ प्रकल्पग्रस्ताच्या हयात असणाऱ्या सर्व वारसदारांची संमती घेणे आवश्यक असताना तसे केल्याचे दिसत नाही केवळ खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे जाणीवपूर्वक कमी वारसदार दाखवून शासनाची तसेच कुटुंबाची फसवणूक केली आहे. मागील १० महिन्यापासून मूळ प्रकल्पग्रस्त महादू बाळा दानवले यांचे वारसदार प्रांत अधिकारी भोर यांच्याकडे दोषींवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्यापही दोषींवर काहीच कारवाई झाली नसल्याने आणि दोषी मंडल अधिकारी मोकाट सुटल्याने भाटघर धरणग्रस्तांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

जो पर्यंत या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत पीडित कुटुंबीय कुठल्याही निवडणुकीसाठी मतदान करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या काही दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचेही दानवले कुटुंबीयांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page